आदिवासी पारधी समाजामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून परिवर्तन घडविणार – समाजसेवक भैरवनाथ भोसले

26

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10ऑगस्ट):-ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समीकरण सेवा प्रकल्पामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेल्या पारधी समाज बांधवांच्या साक्षीने तसेच दै.लोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आदिवासी जागतिक दिन व आदिवासी क्रांती दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यामध्ये आदिवासी पारधी समाज बांधवातील उपस्थितांना संबोधित करताना संतोष मानूरकर म्हणाले की,स्वातंत्र्याच्या गेल्या ७५ वर्षांपासून आजही पारधी समाज मूलभूत सुविधेपासून वंचित आहे.शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,आणि अर्थिक दृष्टीने हा समाज आजही खूप मागे आहे.या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.पुढे बोलताना म्हणाले की,भैरवनाथ भोसले सर सध्या बीड जिल्ह्यामध्ये करीत असलेल्या पारधी समाजाच्या विकासासाठी कामाचे कौतुक करताना म्हणाले की,खरोखरच या समाजाचे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यभरातील संपूर्ण आदिवासी व पारधी समाजाने आष्टी येथे भैरव भोसले सर घेत असलेल्या राज्यस्तरीय पारधी अधिवेशनाला राज्यभरातून संपूर्ण आदिवासी पारधी समाजाने एकत्र येवून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

या अधिवेशनाला माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा असेल.असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सर म्हणाले की,भैरवनाथ भोसले सर बीड जिल्ह्यात करीत असलेले काम हे सामाजिक काम आहे आणि त्यांचे बंधू सुधीर भोसले बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे भरकटलेल्या वंचित पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत.ते एक शैक्षणिक काम आहे म्हणून भैरवनाथ भोसले आणि सुधीर भोसले बीडमधील एक राम लक्ष्मणाची जोडी बनून आदिवासी व पारधी समाजाच्या विकासासाठी,त्यांच्या उत्थानासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत.

त्यांच्या माध्यमातून समाजातील गुन्हेगारीचा शिक्का पुसला जावा तसेच समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी ही जोडी कष्ट घेत आहे.भैरवनाथ भोसले सर येणाऱ्या काळामध्ये राज्यस्तरीय महाधिवेशन घेत आहेत.अधिवेशनाला सर्वतोपरी मदत करुन पूर्ण पाठिंबा देवू असे मत त्यांनी यावेळी मांडले.
या कार्यक्रमामध्ये नामदेव भोसले ज्येष्ठ साहित्यिक तसेच लेखिका बबीता ताई काळे,ह.भ.प.बावने महाराज यांनी आपली मनोगते व्यक्त केली.शेवटी समारोपीय भाषण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी व पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक परमेश्वर काळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,समाजाने रूढी,परंपरा,अंधश्रद्धा विसरून सर्वांनी एक दिलाने एकत्र येऊन समाजाच्या उत्थानासाठी काम करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी,ईश्वर काळे,आक्रोश वेदनांचे या पुस्तकाच्या लेखिका बबीता ताई काळे,अर्जुन काळे,बाप्पू काळे,खंडू काळे,आनंद काळे,वैभव काळे,श्याम भोसले,विठ्ठल पवार,लखन काळे,आकाश शिंदे,जाकी पवार,अरबीनाथ काळे,साईनाथ काळे,सागर भोसले,सचिन भोसले,अग्नेश चव्हाण,आदेश काळे सातारा,प्रमोद शिंदे,सचिन काळे,प्रदीप काळे तसेच इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भोसले सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन अर्जुन काळे तर आभार सुधीर भोसले यांनी मानले.
———————————————-
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाजाची व्यथा मांडणाऱ्या आक्रोश वेदनांचे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आलेल्या भैरवनाथ भोसले सरांच्या मुलाखत (दैनिक लोकप्रभा)अंकाचे प्रकाशन करण्यात आले.