अनेक भोंदू बाबांचे पितळ पाडले उघडे!

34

(नरेंद्र दाभोळकर स्मृती दिवस विशेष)

मला माझ्याच देशात लोकांपासून संरक्षण घ्यायचे असेल तर मला त्यात काहीतरी चुकीचे वाटते. मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे.” असे ठणकावून सांगणारे नरेंद्र अच्युत दाभोळकर साहेब होत. ते मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स.१९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमविले. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापन केली. ते स्वतः या संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष होते. वडील अच्युत लक्ष्मण दाभोळकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होत. त्यांचा जन्म दि.१ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक डॉ.देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. त्यांनी शैला यांच्याबरोबर विवाह केला.

त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्यामधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले. त्यांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. या खेळास उपयोगी असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स.१९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

बाबा आढाव यांच्या एक गाव – एक पाणवठा या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स.१९८९मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर १९९८पासून शेवटपर्यंत संपादक होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे पाडले होते.

मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर ते शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्या. त्यामुळे ते घटनास्थळीच कोसळले. गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. ते २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांच्यापैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे सांगितले जाते. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोळकर साहेबांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर त्यांचे स्वतःचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांकडून ओळख पटविल्यावर पोलिसांनी त्यांची हत्या झाल्याचे घोषित केले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या लोकहिताच्या कार्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक :-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(मराठी लेखक व कवी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली. फक्त व्हा. नं. ७४१४९८३३३९.