तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या तलवाडा येथील पुरातन कल्लोळ तीर्थ याठिकाणी श्री गणेश विसर्जन करू नये – बापू गाडेकर

29

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.15सप्टेंबर):- तालुक्यातील तलवाडा येथे भाविक – भक्तांची मनोकामना पूर्ण करणा-या श्रीक्षेत्र त्वरितादेवी व तुळजाभवानी मातेचे मंदिर असून यात्रा परिसरात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले पुरातन कालीन कल्लोळ तीर्थ ( तीर्थ कुंड ) आहे. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक – भक्त या कुंडातील पाण्याचा तीर्थ म्हणून वापर करतात.

या कुंडातील पाणी तीर्थ म्हणून तोंडात घेऊन ते पाणी डोळयाला देखील लावले जाते. भाविकांच्या श्रद्धेचे हे ठिकाण असून त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. हे we कल्लोळ तीर्थ हजारो नव्हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या तीर्थ कुंडात गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिवशी कोणीही श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये अशी रास्त मागणी पत्रकार बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

तलवाडा या गावात विविध गणेश मंडळ व घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे अविचारीपणाने कल्लोळ तीर्थात करण्यात येते. यामुळे या तीर्थ कुंडात गाळ तयार होऊन पर्यायाने कुंडातील पाणी खराब होते. श्री गणेश मूर्तीचे विसर्जन या कल्लोळ तीर्थात केल्याने जो गाळ साचतो त्यामुळे तीर्थ कुंडाच्या तळाशी असलेली पाणी येण्याची जी छिद्रे आहेत ती बुजतात. याचा आता गांभीर्याने विचार करून पोलिस प्रशासन, विश्वस्त मंडळ व तलवाडा ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी आणि श्री गणेश विसर्जन करण्यासाठी इतर ठिकाणी उपाययोजना करावी असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. याविषयी लेखी निवेदन तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे तसेच ग्रामपंचायत तलवाडा यांना देणार असल्याचे देखील पत्रकार बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.