जय श्रीराम मंदिर विद्यानगर (कुर्झा) येथे बालकदिनानिमित्य विविध उपक्रम

29

🔹सामाजिक बांधिलकी जपून मंदीर समिती चा स्तुत्य उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.16नोव्हेंबर):-आजचा बालक हा उद्याचा सुजाण नागरीक होणार आहे. बालकाच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा तसेच कोविड महामारीमुळे दिड वर्षापासून शालेय शिक्षणापासून वंचित सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांमुलींचा चेहरा आनंदाने फुलावा या उदात्त हेतुने जय श्रीराम मंदीर समितीच्या तरूणाईच्या पुढाकाराने तसेच पतंजली योग समिती ब्रम्हपुरीच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच बालकदिनाचे औचित्य साधून विद्यानगर कुर्झा येथे विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

बालकांना व्यायाम, प्राणायम , योग इत्यादीची माहीती प्रात्याक्षिकासह भगवान पालकर जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती चंद्रपूर जिल्हा यांनी दिली. रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी स्त्री भृणहत्या , बेटी बचाव तसेच बालकदिनाचे महत्व या विषयाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. चित्रकला स्पर्धेत देखिल वार्डातील बालकांनी विविध गटामध्ये उस्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी जनरल नाॅलेज ,कौटोंबिक संस्कार व योग प्राणायम या विषयांवर बालक तथा तरूण तरूणींची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन संस्कारमय पिढी घडावी असा तिळभर प्रयत्न करण्यात आला.सर्व स्पर्धेत सहभागी उत्कृष्ट तीन – तीन विजेत्यांना बक्षीस व खाऊ देऊन पतंजली परीवार ब्रम्हपुरी व मंदीर समिती कुर्झा तर्फे गौरविण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जय श्रीराम मंदीर समिती विद्यानगर कुर्झाचे सर्व सदस्य,पतंजलि योग समिती ब्रम्हपुरी व विद्यानगर वासीय मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

‘मंदीर हे निव्वळ धार्मिक अधिष्ठानाचे स्थळ म्हणून मर्यादीत न राहता समाजाचे प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपणारे साधन व्हावे’ हेच ब्रिद उराशी बाळगून मागील अनेक दिवसांपासून जय श्रीराम मंदिर समितीची तरूणाई व विद्यानगर वार्डवासीय रक्तदान शिबिर ,योगप्राणायमाचे दैनिक वर्ग , तान्हा पोळा आयोजन ,कबड्डी स्पर्धा , बालकांच्या , महिलांच्या विविध स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रमाचे यशस्वी आयोजन करीत आहेत.तरूणाईच्या या समाजोपयोगी प्रयत्नांचे ब्रम्हपुरीत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.