चौथे एकता मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डाॅ.दासू वैद्य यांची निवड

31

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.17नोव्हेंबर):-एकता फाउंडेशन शिरूर कासार आयोजित चौथे एकता मराठी साहित्य संमेलन दि.२९ व ३० डिसेंबर रोजी पिंपळनेर ता.शिरूर का.,जि.बीड येथे संपन्न होणार असून या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध गीतकार,साहित्यिक तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे मराठी विभाग प्रमुख मा.प्रा.डाॅ.दासू वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती एकता फाउंडेशनचे संस्थापक सदस्य लखुळ मुळे,नितीन कैतके व राजेश बीडकर यांनी दिली.

फाउंडेशनचे कोषाध्यक्ष योगगुरू शिवलिंग परळकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव गोकुळ पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीस संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड,उपाध्यक्ष मा.उपप्राचार्य माही शेख,सहसचिव शिवचरित्रकार कैलास तुपे,व्यंगचित्रकार दिपक महाले,इंजि.संदीप ढाकणे,कैलास खेडकर फौजी आदी सभासद उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही एकता मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून या दोन दिवसीय संमेलनात पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी,उद्घाटन सोहळा,सन्मान भुमीपुत्रांचा,राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार वितरण सोहळा,व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन,महाराष्ट्राची लोकधारा,लेखक आपल्या भेटीला,मी असा घडलो (आयएएस,आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची मुलाखत),प्रश्नमंजुषा,सांस्कृतिक कार्यक्रम हे उपक्रम संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी परिसंवाद,कथाकथन,कविसंमेलन,
समारोप आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असे अनेकविध कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या सल्लागार तथा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.भाग्यश्री ढाकणे,शि.सह.पत.च्या संचालिक रंजना फुंदे,आदर्श शिक्षिका मीरा दगडखैर आणि ब्रँड हाऊसच्या संस्थापिका रंजना डोळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

या वर्ष अखेरीस मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनामध्ये व्यंगचित्र प्रदर्शन,ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्रीचे स्टाॅलही लागणार आहेत.या कार्यक्रमात राज्यभरातील कवी,लेखक,साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्थानिक परिसर व तालुक्यातील शालेय,विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह वाचक,रसिक,श्रोत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह पिंपळनेर व परिसरातील लोकप्रतिनिधींनी केले आहे.