स्वच्छता , पर्यावरण आणि व्यसनमुक्ती साठी गोंडवाना विद्यापीठाने विविध प्रकल्प राबवावे – सीनेट सदस्य अजय काबरा यांची मागणी

30

🔸कुलगुरु श्री श्रीनिवास वरखेड़ी यांच्याकडुन सकारात्मक पाऊल

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.21नोव्हेंबर):-नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत सीनेट सदस्य अजय रमेशचंद्र काबरा यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी विद्यापीठाच्या मार्फत संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविन्यात यावे अशी मागणी केली.या संदर्भात सीनेट बैठकीत सविस्तर विवेचन करतांना अजय काबरा यांनी या अभियानाचे महत्व व आवश्यकता विषद केले. मागील दीड ते दोन वर्षापासुन सर्वच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर बंदी असल्याने कार्यक्रम होऊ शकत नव्हते , पण आता शासनाच्या निर्देशानुसार महाविद्यालये रितसर सुरू झालेली आहेत.

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पदारूढ झाल्यावर त्यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्याच संबोधनात स्वच्छ भारत अभियानासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. स्वच्छ भारत होण्यासाठी देशात सर्वदूर विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष विविध कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशात साजरा होत आहे. गोंडवाना विद्यापीठ निर्मितीचे शिल्पकार माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यानी या विद्यापीठाद्वारे कल्पक उपक्रम राबविले जावेत अशी आशा दीक्षांत समारोहात व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” स्वच्छ भारत अभियान ” या महत्वाकांक्षी अभियानाला गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविन्याची मागणी यावेळी सीनेट सदस्य अजय काबरा यांनी सभागृहात केली.

या अभियानाबाबत अधिसभेत प्रस्ताव मांडतांना स्वच्छता , पर्यावरण आणि व्यसनमुक्ति या त्रिसूत्रीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृति करता येऊ शकते असे स्पष्ट करीत राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग घेत हा अभियान शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविता येईल असा आशावाद व्यक्त केला. सोबतच विद्यापीठाच्या संयोजनातून चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा तसेच कलापथकाच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी होऊ शकते असे सभागृहात सांगितले. केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापुरते हे अभियान सिमीत न ठेवता गोंडवाना विद्यापीठाद्वारे स्वच्छता , पर्यावरण आणि व्यसनमुक्ति विषयक ही चळवळ कायमस्वरूपी सुरु ठेवावी अशी मागणी प्रस्ताव ठेवतांना अजय काबरा यांनी केली.

या प्रस्तावाची गोंडवाना विद्यापीठाचे माननीय कुलगुरु श्री श्रीनिवास वरखेड़ी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करित लवकरच याबाबत सकारात्मक व योग्य पाऊले उचलण्याबाबत सभागृहाला आश्वस्त केले.स्वच्छता , पर्यावरण आणि व्यसनमुक्ति विषयक या प्रस्तावाला सभागृहात उपस्थित प्राचार्य देवीदास चिलबुले , संजय रामगिरवार , डॉ प्रशांत दोन्तुलवार , प्रशांत ठाकरे , एड. गोविंद भेंडारकर , डॉ प्रगति नरखेड़कर , संदिप पोशट्टीवार , मनीश पांडे , पुरुषोत्तम गादेवार , डॉ परमानंद बावनकुळे , डॉ पी अरुणप्रकाश , चांगदेव फाये , संदीप लांजेवार , डॉ अनिल कोरपेनवार यांचेसह अनेक सीनेट सदस्यांनी अनुमोदन दिले.यापूर्वीसुद्धा अधिसभेच्या अनेक बैठकीत विद्यापीठ परिसरात स्वच्छतेचा व व्यसनमुक्ति चा मुद्दा अजय काबरा यांनी उचलून धरला होता.