डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न…

47

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19डिसेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे दिनांक 18 नोव्हेंबर या अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अल्संख्यांकांचे अधिकार, सायबर क्राइम, वाहतुकीचे नियम अशा विविध विषयांना अनुसरून एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी भूषविले होते. ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मा.रोशन यादव, ए.पी.आय. आशिष बोरकर, ब्रह्मपुरी येथील कायदेविषयक सल्लागार ॲड.आशिष गोंडाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश कोसे विचार मंचावर उपस्थितीत होते.

सायबर क्राईम या विषयावर बोलताना ए.पी.आय. आशिष बोरकर आणि पोलीस अंमलदार नरेश कोडापे यांनी सायबर क्राईम कसा घडतो आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मा.रोशन यादव यांनी उपस्थितांना वाहतुकीविषयी असलेल्या विविध नियमांविषयी अवगत करून स्वतःच्या आणि इतरांच्या जिविताचे संरक्षण करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख मार्गदर्शक मा.ॲड.आशिष गोंडाणे यांनी अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि भारतीय संविधान या विषयावर भाष्य करतांना अल्पसंख्यांक ही संज्ञा स्पष्ट करून अल्पसंख्यांक दिनाचे महत्व विशद केले आणि भारतीय संविधानामध्ये अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या विविध तरतुदींवर प्रकाश टाकला.

आपल्या अध्यक्षीय संबोधनात प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी अल्संख्यांकांच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आणि वाढत्या सायबर क्राइम आणि रस्ते अपघातांविषयी चिंता व्यक्त करून युवा पिढीने वेळीच सावध होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील संगीत विभागाने सुमधुर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातील जूनियर अंडर ऑफिसर गायत्री ठाकरे ही विद्यार्थिनी बी.एस.एफ. कमांडो म्हणून देहरादून येथे निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुषगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश कोसे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक वृंद तथा ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी या मार्गदर्शन शिबिरात उपस्थित होते.