चिंतामणी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी लोकनेते बदामराव पंडित यांची बिनविरोध निवड

36

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.7जानेवारी):- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या चिंतामणी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून, व्हाईस चेअरमनपदी आसाराम डोंगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून, त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या चिंतामणी दूध उत्पादक संघाच्या नूतन संचालक मंडळाची दि 30 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक झाली असून, यात शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखालील सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चिंतामणी दूध उत्पादक संघाच्या नूतन संचालकांची बैठक दिनांक 7 जानेवारी रोजी होऊन त्यात चेअरमनपदी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची तर आणि व्हाईस चेअरमनपदी आसाराम डिंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आर. एस. मोटे, सहाय्यक मिलिंद देशपांडे आणि दूध संघाचे व्यवस्थापक बापूराव कुलकर्णी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडीनंतर चेअरमन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पत्रकारांशी संवाद साधून, चिंतामणी दूध उत्पादक संघाची माहिती दिली. यात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडून 22 दूध संस्था मार्फत तसेच 4 वयक्तिक मोठे दूध धारक शेतकऱ्यांकडून 5 हजार 500 लिटर दररोज दूध संकलन करण्यात येत आहे. जातेगाव रोडवर चिंतामणी दूध उत्पादक संघाकडून दूध शीतकरण केंद्रात, 10 हजार लिटर दूधाचे शीतकरण सुरू झाले असून, तसेच येथे दूध क्रिम तयार करणेही सुरू झाले आहे. दूध पिशवी पॅकिंग, खवा आणि पनीर याचेही उत्पादन लवकरच करण्याचा आपला मानस असल्याचे यावेळी बदामराव पंडित यांनी सांगितले.

नूतन निवड झालेल्या संचालक मंडळामध्ये चेअरमन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, व्हाईस चेअरमन आसाराम डोंगरे यांच्यासह भारत नेटके, सुंदर नवले, श्रीमंतराव यादव, राजेश यादव, पार्वती मदन मासाळ, कुसुम बळीराम लोणकर, शांताबाई विठ्ठल उमप, आसाराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.