चला अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवूयात!!!!

  45

  पुरोगामी संदेश नेटवर्क

  आज २१जूनला एक सुंदर खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल.
  ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच काही गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न!!!

  *ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत*
  ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही

  *ग्रहणात हवा अशुद्ध होते*
  सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही.

  *पाणी अशुद्ध होते -ग्रहण सुटल्यावर घरातील पाणी ओतून टाकून नवीन पाणी भरावे*
  ग्रहणात जर घरातील पाणी अशुद्ध होत असेल तर टाकीतले, नदीतले ,धरणातले पाणी सुद्धा अशुद्ध व्हायला हवे.घरातील पाणी ओतून देऊन टाकीतले पाणी भरणे हे तर्क दृष्ट्या सुद्धा हास्यास्पद आहे.घरातले पाणी झाकून ठेऊ पण संपूर्ण धरण उघड्यावर आहे त्याचे काय करणार??

  *ग्रहणात शरीर अशुद्ध होते म्हणून ग्रहण सुटल्यानंतर शरीरशुद्धीसाठी स्नान करावे.*
  जर चंद्राच्या सावलीत आपले शरीर अशुद्ध होत असेल तर झाडाच्या सावलीत, इमारतीच्या सावलीत पण व्हायला हवे.आणि जर पाणी अशुद्ध होत असेल तर अशुद्ध पाण्याने अंघोळ करून शरीर शुद्ध कसे होणार???

  *ग्रहणात अन्न दुषित होते ,ग्रहणात काहीही खाऊ नये. ग्रहणा आधीचे अन्न टाकून द्यावे*
  ग्रहणानंतर घरातील अन्न पदार्थ जर फेकून दिले जात असतील तर सगळी शेते उघड्यावर आहेत.त्यांचे काय??शेतातील धान्य, बाजारातील अन्नपदार्थ, हे जर चालत असतील तर घरात शिजवलेल्या अन्नच कस दूषित होते??ग्रहणात जरी काही खाल्ले नाही तरी ग्रहणापूर्वी खाल्लेले अन्न पोटात असणार.ते पण दूषित होऊन विषबाधा व्हायला हवी पण तसे होताना दिसत नाही.

  *ग्रहणकालात झोपू नये*
  खरतर एवढी दुर्मिळ खगोलीय घटना होताना ग्राहणाचे विलोभनीय दृश्य पहायचे सोडून झोपा काढणे हा कपाळकरंटेपणाच म्हणायला हवा.पण ग्रहणात झोप काढली तरी काही फरक पडत नाही.

  *ग्रहणकालात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये.ग्रहणाचे नियम न पाळल्यास विकृत शरीराचे मूल जन्माला येते*
  एका वर्षात कमीत कमी ४ आणि जास्तीतजास्त ७ ग्रहणे होऊ शकतात. जगात एकाच वेळी लाखो स्त्रिया गर्भवती असतील. जर असे असेल तर जगाची निम्मी लोकसंख्या शारीरिक विकृत असायला हवी होती.ग्रहणाचा परिणाम अमेरिकन, आफ्रिकन, चिनी, पाकिस्तानी गरोदर स्त्रियांवर न होता फक्त भारतीय स्त्रियांवरच कसा काय होतो??

  ग्रहण काळात जेवण, झोप अशी दैनंदिन कृत्ये करण्यात गुंतून न पडता ग्रहण पाहावे म्हणून कदाचित आपल्या पूर्वजांनी ग्रहणकाळात नदी किनारी जाऊन जपजाप इत्यादी करावे अशा काही प्रथा निर्माण केल्या असाव्यात.निदान या निमित्ताने तरी जन सामान्यांचे ग्रहणाचा स्पर्श-मध्य-मोक्ष याकडे लक्ष असते.पण सध्या श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे अवडंबर जास्त माजवले जात आहे.सोशल मीडियावर ग्रहण कसे पाहावे ,त्याची शास्त्रीय माहिती पेक्षा भीती पसरवणारे मेसेज पसरवले जात आहेत.

  या सगळ्या अंधश्रद्धा आपण आपल्या भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पाळतो.पण आपल्याला एक प्रदीर्घ वैज्ञानिक वारसा आहे.इसवीसनाच्या ४ थ्य शतकातील महान खगोल तज्ञ आर्यभट्टानी स्पष्ट पणे सांगितले आहे की ग्रहण ही शुद्ध खगोलीय घटना असून सावल्यामुळे होते.
  *छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया*॥(आर्यभटिय-गोलपाद अध्याय४ श्लोक ३७)

  वराहमिहिर ,ब्रह्मगुप्त भास्कराचार्य या खगोलशास्त्रज्ञांनी देखील हेच सत्य वारंवार सांगितले आहे.असे असतांना संस्कृतीच्या नावाखाली आपण निरर्थक अंधश्रद्धा पाळत हास्यास्पद कृत्ये करत असू तर आपण वैज्ञानिक वारसा असणाऱ्या आपल्याच भारतीय संस्कृतीचा आपण अपमान करत आहोत.

  त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहण बघणे, इतरांना बघायला लावणे आणि गैरसमजांचे निराकरण करणे हाच खरा भारतीय संस्कृतीचा सन्मान होय!!!