दापोरी येथील उच्च दाब विद्युत वाहिनी हजारो नागरीकांच्या जीवावर

31

🔸विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी !

🔹महावितरण कंपनी, जिल्हा नियोजन समितीचे दुर्लक्ष !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.10जानेवारी):-दापोरी येथील श्री संत लालदासबाबा संस्थानच्या सभामंडपावरून गेलेली ११ केव्ही उच्चदाब वाहिनी हजारो नागरिक व भक्तांसाठी धोक्याची ठरत आहे. दापोरी येथील सभामंडपामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ होत असतांना भाविक भक्तांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्यामुळे या उच्चदाब वाहिनीवर स्पार्किंग होऊन विजेचे गोळे पडण्याचे प्रकार नेहमी घडतात यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे भक्तांच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीन सभामंडपावरून गेलेली ११ केव्ही उच्चदाब वाहिनी तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदनाद्वारे केली .
दापोरी येथे लाखोंचे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदासबाबा संस्थानला जिल्हा नियोजन समिती तर्फे क वर्ग पर्यटन दर्जा, क तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र लालदासबाबा सभागृहावरून गेलेली ११ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी हजारो भक्तांच्या व नागरिकांच्या जीवास धोकादायक ठरत असून विद्युत लाईन खांब स्थलांतरित करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात आली असून या गंभीर प्रकाराकडे महावितरण कंपनी व जिल्हा नियोजन समिती दुर्लक्ष करतांना दिसत असल्यामुळे सभागृहाच्या वरून गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवास धोका पोहोचवतील, अशा अवस्थेत असल्याने मंदिर सभागृहावारील उच्च दाब वाहिनी केव्हा स्थलांतरित होणार असा प्रश्न दापोरी परिसरातील नागरिक विचारत आहेत.
‘नको देवराया, अंत आता पाहू’ अशी स्थिती सध्या दापोरी येथील नागरिकांची व हजारो भक्तांची झाली आहे.

कारण, मागील काही वर्षांपूर्वी वीजवितरण कार्यालयाने दापोरी येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता नागरिकांना अडथळा ठरेल अशाप्रकारे लोखंडी टिनपत्रे असलेल्या सभामंडपा वरून मधोमध दोन ते तीन फुटाचे फुटांच्या अंतरावरून विद्युत लाईन नेली आहे. या गंभीर विषयांची दखल घेऊन ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन नागरिकाच्या जीवितास धोकादायक ठरत असलेली विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

लालदासबाबा सभामंडपावरून गेलेल्या धोकादायक उच्च दाब विद्युत वाहिणीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात प्राणहानीदेखील होण्याची दाट शक्यता आहे, विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरीता दोन वर्षापासून महावितरण कंपनीने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला असून सुद्धा निधी उपलब्ध करून दिला नसल्यामुळे त्याचे गांभीर्य कोणीच घेतांना दिसत नसल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केला.