सोनवद बु. येथे सावित्रीमाई व जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन संपन्न…

29

🔹 महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या !..- पी.डी.पाटील सर.

🔸महापुरुषांना जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका – लक्ष्मणराव पाटील

✒️पी.डी. पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगांव(दि.12जानेवारी):- तालुक्यातील सोनवद बु॥ गावात आज रोजी महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधनाचे प्रास्ताविक चंद्रशेखर भाटीया यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगांव पं.स.सभापती प्रेमराज पाटील होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सोनवद बु.च्या सरपंच आशा उज्वल पाटील, उपसरपंच नारायण देवरे, ग्रा.स.लताबाई धनगर, गुलाबराव पाटील, उज्वला पाटील, निवृत्त शिक्षक जिजाबराव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, माजी सरपंच पुंडलिक जगन्नाथ पाटील (बाळू आबा), सोनवद खु.मा.सरपंच चंद्रशेखर भाटीया, उज्वल शालीग्राम पाटील, आदर्श शिक्षक सुनिल पाटील, ग्रामसेवक अरविंद ठाकरे, सोनवद खु.चे सरपंच बाळू शिरसाठ, संदिप पाटील, अस्लम खाटिक, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रमुख वक्ते पी.डी.पाटील सरांनी महामातांचे जीवन चरित्र सांगून, सर्वांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा असा सल्ला दिला. तसेच घराघरात जिजाऊ व सावित्रीमाई जन्माला आल्या पाहिजेत. शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. ‘महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या’, असे प्रतिपादन केले. शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दाम्पत्यांनी केलेले आहे. शिक्षणाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. शिवरायांच्या खऱ्या गुरु राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व राष्ट्रसंत तुकोबाराय होय. छत्रपती शिवरायांना अवघ्या ५० वर्षाचे आयुष्य लाभलं यामध्ये त्यांनी हजारो वर्षांची गुलामगिरीचा नायनाट केला, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.सर्व उपस्थित माता, भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर भाटीया यांनी मानले. प्रबोधनपर व्याख्यान यशस्वीतेसाठी सोनवद बु॥ गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.सदस्य, युवक मित्र व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.