नथुराम जगासमोर आणा पण खरा…

30

महात्मा गांधींची जयंती असो की पुण्यतिथी ऐन याचवेळी काही मोजक्या लोकांना नथुराम गोडसेबद्दल पुळका येतो. नथुरामच्या उदात्तीकरणासाठी सुद्धा ह्या गोडसे समर्थकांना गांधी जयंती-पुण्यतिथी हाच मुहूर्त लागतो. म्हणजे नथुराम गोडसेवरील चित्रपटाचे अनावरण देखील गांधी पुण्यतिथीलाच केले जाते गोडसेच्या मृत्यूदिनी नाही. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा परंतु जसा आहे तसाच. म्हणजे खर्‍या स्वरूपात.गांधींच्या हत्येच्या समर्थनाकरिता नथुराम गोडसे याने आपल्यावरील आरोपपत्राला उत्तर देतांना ८ नोव्हेंबर १९४८ रोजी न्यायालयात जे ९३ पानांचे निवेदन दिले त्याचा दाखला दिला जातो. आजच्या नवीन पिढीला सुद्धा त्याच निवेदनाच्या ऑडिओ टेप ऐकविल्या जातात व गांधी कसा खलनायक होता व नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसविण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातात. यावर्षीसुद्धा गांधी पुण्यतिथीला सोशल मीडियावर गोडसे समर्थकांनी भरभरून गोडसे च्या समर्थानात खोट्या गोष्टींचा प्रचार केला. खोट्या पोस्ट फिरवल्यात. ज्यांनी गांधी आणि गोडसे बद्दल पुस्तके वाचलीत त्यांना ह्या अपप्रचाराने फरक पडणार नाही, परंतु ज्यांनी कधीच गांधी आणि गोडसे बद्दल एकही पुस्तक वाचले नाही अशा न्यूट्रल लोकांना ह्या खोट्या पोस्टवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. बरे ह्या खोट्या पोस्ट फिरवणाऱ्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नसतं हे विशेष.
नुकताच यावर चित्रपट निघालाय. मी गांधींना का मारले? नावातच नथुरामाचे उदात्तीकरण आहे. या चित्रपटात नथुरामची भूमिका करणार्‍या डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर समाजातील विविध स्तरातून टीका झाली. काही लोकांनी कलाकाराला भूमिका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे अशीही बाजू मांडली.

कलाकाराला निश्चितच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु कलाकारानेसुद्धा आपल्या भूमिकेतून आपण ज्या व्यक्तीची भूमिका करतोय त्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होत आहे की नाही? त्या भूमिकेतून इतिहासाची मोडतोड तर होत नाही ना? चुकीच्या गोष्टींचे समर्थन तर होत नाही ना ह्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत हे सुद्धा तितकेच खरे. उद्या ‘मी पृथ्वीराज चव्हाणांना का मारले?’ असे शीर्षक देत मोहोम्मद घोरीचे उदात्तीकरण करणारा चित्रपट निघाला तर तुम्ही त्यात मो.घोरीची भूमिका कराल काय? उद्या छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येच्या समर्थनार्थ मी संभाजींना का मारले, असा चित्रपट निघाला तर काय त्यात तुम्ही औरंगजेबाची भूमिका करणार का? आज जेव्हा कट्टरवाद्यांचा जोर देशात वाढलाय अशा वातावरणात कुणाचीही भीडभाड न ठेवता डॉ. अमोल कोल्हेंनी मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंचा खरा इतिहास दाखविला. त्यामुळे त्यांच्याकडून खरा नथुराम समोर येणे अपेक्षित होते. ह्या चित्रपटाची शूटिंग जरी 2017 ला झालेली असली तरी 2017 ला नथुरामचा इतिहास काही वेगळा नव्हता. खर्‍या नथुरामबद्दल जाणून घेण्यासाठी तेव्हाही पुस्तके उपलब्ध होती आणि आजही आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हेंनी दिलेली कारणे अत्यंत तकलादू वाटतात.

नथुरामाच्या ह्या खोट्या प्रचारापैकी सर्वात मोठा अपप्रचार असा की, नथुराम गोडसे ने सुनावणीदरम्यान न्यायालयात जे बयान दिले ते जगासमोर का येऊ देईल नाही, का लपवून ठेवण्यात आले वगैरे. अहो, ते बयान जर लपवून ठेवण्यात आले असते, लोकांसाठी खुले केले नसते तर त्याच बयाणावर आधारित 55 कोटींचे बळी हे पुस्तक गोपाल गोडसे कशाच्या आधारावर लिहिले असते? नथुरामवर जे चित्रपट, नाटक; लिहिले गेलेत ते कशाच्या आधारावर लिहिले गेले असते? गोडसे समर्थक ज्या नथुरामच्या बयानाच्या पोस्ट फिरवत आहेत तसेच ज्या ऑडिओ क्लिप फिरविल्या जाताहेत त्या कशाच्या आधारावर फिरवल्या असत्या? ते नथुरामने कोर्टात सादर केलेले निवेदन खटला चालला तेव्हापासूनच सर्वांसाठी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की, नत्थूरामाने जे निवेदन दिले ते अगदी 100% खरेच आहे असे कुणी कसेकाय म्हणू शकतो? कोर्टात प्रत्येकच आरोपी स्वतःची सकारात्मक बाजू मांडत असतो म्हणजे तो खराच बोलत असतो काय? कोर्ट ते पडताळून बघणार नाही काय?

नथुरामने न्यायालयात सांगितले की गांधींनी देशाची फाळणी केली आणि 55 कोटी पाकिस्तानला द्यायला लावले, मुस्लिमांना झुकते माप दिले म्हणून मी गांधींना मारले. परंतु तत्कालीन पुरावे तपासले तर नत्थूरामाचा शब्द अन शब्द धादांत खोटा असल्याचे आपल्या लक्षात येईल. 1934 सालापासून गांधींवर 5 वेळा हल्ले झालेत. त्यात नत्थुराम गोडसे सामील होता. 1944 मध्ये देशाची फाळणी झालेली नव्हती, त्यामुळे 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा विषयच नव्हता मग त्यावेळी नत्थुराम पाचगणीला गांधींवर चाकू घेऊन का धावला? साताऱ्याच्या भिलारे गुरुजींनी नत्थुराम ला पकडून दाबून धरले होते. मग त्यावेळी फाळणी आणि 55 कोटींचा विषय नसतांना गांधींवर का हल्ला केला हे तो बयाणात सांगत नाही.
गांधी मुस्लिम धार्जिणे होते म्हणतोय पण टिळकांनी 1916 साली केलेल्या लखनौ करारात मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण दिले, उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला, मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला टिळकांच्या नेतृत्वातील काँग्रेसकडून 1916 साली मान्यता देण्यात आली. या कराराचे समर्थन करतांना टिळक म्हणाले होते ’आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही हिंदूंनी वाजवीपेक्षा झुकते माप दिले असे काही जणांचे म्हणणे आहे. स्वराज्याचे हक्क फक्त मुस्लिम समाजाला दिले गेले, तरी मला त्याची पर्वा नाही,’ इथपर्यंत टिळकांचं मुस्लिमांना समर्थन होत. पण टिळकांबद्दल नत्थुराम एक शब्दसुद्धा बोलत नाही. आणि ’हिंदू धर्म माझा जीव आहे. गीता माझी माता आहे’, असे म्हणणार्‍या व ज्यांच्यामागे या देशातला संपूर्ण हिंदू होता त्या गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणतो.

गांधींनी कायम मुस्लिमांच्या अवाजवी मागण्यांचा स्वीकार केला असे गोडसे सांगतो परंतु मुस्लिमांच्या कोणत्या मागण्या गांधींनी स्वीकार केल्या याबद्दल मात्र कुठलंही स्पष्टीकरण तो देत नाही. कारण 1916 मध्ये टिळकांनी लखनऊ करारामध्ये जे मुस्लिमांच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर काँग्रेसने किंवा गांधींनी मुस्लिमांच्या कोणत्याच मागण्या कधीच मान्य केल्या नाहीत. उलट टिळकांनी मुस्लिमांना दिलेले विभक्त मतदारसंघ व उर्दू भाषेला दिलेला विशेष दर्जादेखील स्वातंत्र्यानंतर गांधींनी काढून टाकायला लावला.आपल्या निवेदनातून स्वतः ला देशभक्त सिद्ध करू पाहणार्‍या गोडसेने मात्र स्वातंत्र्यलढ्यात कुठेच सहभाग नोंदविलेला दिसत नाही. अनेकदा देशभक्त गांधींवर हल्ले करणारा गोडसे एकदाही कुण्या इंग्रजांवर हल्ला करतांना दिसला नाही. कारण नत्थुराम भ्याड होता गांधींची हत्या केल्यानंतर मी हिंदू आहे हे छातीठोकपणे सांगण्याचीही त्याच्यात हिम्मत नव्हती. स्वतंत्र्य भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे हा प्रत्यक्षात तो एक नंबरचा फट्टू होता. त्याच्या भ्याडपणाचा आणखी महत्वाचा पुरावा म्हणजे 15 नोव्हेम्बर 1949 ला नथुरामला फाशी देत असतांना तेथे उपस्थित असलेल्या जस्टीस खोसला यांनी प्रत्यक्ष पाहिलेला प्रसंग त्यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे.नत्थुराम आणि आपटे या दोघांनाही कोठडीतून मागे हात बांधून कोठडीतून बाहेर आणलं गेलं. गोडसे समोर चालत होता.त्याचे पाय फाशीला जातांना अडखडत होते, त्याची चाल त्याची घाबरलेली अवस्था आणि वाटणार्‍या भीतीची साक्ष देत होती त्याने बाहेरून मजबूत दाखविण्याचा प्रयत्न करतांना अखंड भारताचा नारा दिला.

परंतु त्याचा आवाज फाटत होता, कोर्टात त्याने दाखविलेला उत्साह ओसरला होता. शेवटच्या दिवसात तो आपल्या कृत्यावर पच्छाताप करत होता आणि तो म्हणत होता की, एक संधी जर मला भेटली तर उरलेले आयुष्य मी शांती च्या प्रचारात आणि देशाच्या सेवेत लावेल. दोघांना फाशी दिली गेली. दोघांच्याही प्रेतावर तुरुंगातच करून त्यांची राख घघ्घर नदीमध्ये अनोळखी जागेवर वाहून टाकण्यात आली.” ह्या गोष्टी मात्र नथुरामचा उदो-उदो करणारे हे खोटे प्रचारक कधीच सांगत नाहीत. याबद्दल मी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे घग्गर नदीत एका अनोळखी जागेवर वाहून दिलेली नत्थूरामाच्या जळालेल्या शरीराची राख ह्या गोडसे समर्थकांनीं कुठून आणली हे आजही न उलगडलेलं कोडं आहे.ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात गांधींजवळ कोणती पावर होती? पोलिसांची पावर होती की सैन्याची पावर होती? गांधींकडे फक्त या देशातील जनतेची त्या जनतेच्या प्रेमाची पावर होती. आणि या देशावर, देशातील नागरिकांवर प्रेम करणार्‍या गांधींचा खून करणे म्हणजे या देशातील नागरिकांचा, त्यांच्या भावनांचा खून करणे आहे. हे फक्त एक दहशतवादीच करू शकतो.फाळणीसाठी व भारतातील दंगलींकरता मुख्य जबाबदार मुस्लिम लीग, तिचे नेते व मुख्यत्वे मोहम्मद अली जीना यांना मारणे तर दूरच त्यांचा गोडसेने कधी साधा निषेध सुद्धा केलेला नाही. ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ चा ठराव घेतांना जीना म्हणाले होते, इंग्रजांजवळ भरपूर शस्त्रं आहेत. काँगेसजवळ सत्याग्रह आहे. आमच्याजवळ पिस्तूल आहे आणि त्याचा उपयोग करायची वेळ आली आहे. वायव्य सरहद्द प्रांताचे मुस्लिम लीग नेते अबुलरब निस्तार यांनी तर ‘रक्ताच्या नद्या वाहिल्याशिवाय पाकिस्तान मिळणार नाही. अशी प्रक्षोभक वक्तव्ये करून व ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ प्लॅन कृतीत आणून देशभरात दंगली घडविणार्‍या मुस्लिम लीगच्या नेत्यांबद्दल गोडसे एकदाही आपल्या निवेदनातून साधा निषेध व्यक्त करत नाही. त्यांच्यावर हल्ले करत नाही.

पण ह्या दंगली ज्यावेळी घडत होत्या तेव्हा ज्या नौखालीत मुस्लिमांची संख्या 90% व हिंदू फक्त 10% असल्याने हिंदुधर्मीय लोक मोठ्या प्रमाणात दंगलीत बळी पडत होते त्यावेळी ज्या गांधींनी त्या नौखालीत दाखल होऊन, दुःखितांचे दुःख निवारण झाल्याशिवाय मी नौखालीतून हलणार नाही. त्यात मला मृत्यू आला तरी चालेल, पण पराभूत होऊन मी परतणार नाही अशी प्रतिज्ञा करून तिथली दंगल शमवली त्या 80 वर्षांच्या म्हातार्‍या निःशस्त्र गांधींची मात्र हत्या करतो? या सर्व गोष्टींची कारणे द्यायला गोडसे बहुधा विसरले असावेत. संपूर्ण आयुष्यभर ब्रिटिशांशी लढलेल्या देशभक्त गांधींवर शेकडो आरोप लावतांना स्वतः देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध केलेले एकही कार्य नथुराम गोडसे लिहू शकला नाही, फाळणीला जबाबदार मुस्लिम नेत्यांविरुद्ध एकही कारवाई तो लिहू शकला नाही ही बाब गोडसेचा राष्ट्रद्रोहीपणा व खोटेपणा उघड करण्यास पुरेशी आहे. हा खरा नथुराम जगासमोर आला पाहिजे.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६
(मजबुती का नाम गांधी)