परळीत तीन गावठी पिस्तुलांसह दोन आरोपी ताब्यात; एका महिन्यातील पोलिसांची तिसरी कारवाई

33

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.23फेब्रुवारी):- जिल्ह्यात गावठी पिस्तुल सारखं घातक शस्त्र विक्री करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परळी पोलिसांनी एका महिनाभरात तिसऱ्यांदा गावठी पिस्तुल विकतान ताब्यात घेतलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाळूमाफियापासून गुटका माफियांपर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वावर वाढताना पाहायला मिळत असतानाच आता तर चक्क शस्त्रास्त्रांचीसुद्धा तस्करी बीडमध्ये केली जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आणि त्याचं कारण ठरलं आहे. बेकायदेशीर गावठी रिव्हॉल्वर विकणाऱ्यांवर तीन कारवाया पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात केल्या आहेत.

परळी शहरात दोघांकडून तीन गावठी रिव्हॉल्व्हर जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. आजच्या कारवाईत दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलं आहे. परळीच्या चांदापूर रोडवर गावठी पिस्तुल विकणारे येत असल्याची माहिती डीबी पथकाच्या यंत्रणेला मिळाल्यानंतर त्यांनी यांच्याविरुद्ध सापळा लावला. याची माहिती आरोपींना होताच घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. यावेळी डीबी पथकातील पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत मनोज गिते आणि बाळु यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तीन गावठी कट्ट्यांसह सात जिवंत काडतूसं आढळून आली. या घटनेनं परळी शहरात खळबळ उडाली आहे.