औष्णिक विद्युत केंद्र परळी (वै.) येथून निघणाऱ्या राखीची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

29

🔸महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.ना. आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्री मा.ना. संजय बनसोडे यांची आ.गुट्टे यांनी मुंबई येथे घेतली भेट

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ जिल्हा बीड येथून येणाऱ्या राखीचे व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नसल्याने सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.ना. आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्री मा.ना. संजय बनसोडे यांची आज भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली.औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ जिल्हा बीड येथून वीज निर्मिती दरम्यान निघणाऱ्या राखेचे ढीग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ., जिल्हा प्रमुख मार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या बाजूस टाकलेले आहेत. हवा सुटल्यानंतर सदरील राख इतरत्र पसरली जात असल्याने अगदी दहा फुटावरील माणूस अथवा वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.

राखेची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नसल्याने नाकातोंडात राख जाऊन या परिसरातील लोकांचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. हवेत मिसळलेली राख सतत डोळ्यात गेल्याने अनेक नागरिकांना डोळ्याचे आजार होऊन यातील काहींनी तर आपले डोळे कायमचे गमावले आहेत. अस्थमा आजाराने त्रस्त नागरिकांना जीवन जगणेही कठीण झाले असून लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. या कारणाने आजारी पडलेले अनेक रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणार्‍या राखेची एका महिन्याच्या आत व्यवस्थित विल्हेवाट लावावी अन्यथा जनआंदोलन उभारून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अहिंसक मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.ना. आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री मा.ना. संजय बनसोडे आणि अध्यक्ष तथा सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांना म्हटले आहे.आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नाने परळी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणार्‍या राखेची व्यवस्थित विल्हेवाट लावून सामान्य नागरिकांची यातून कायमची सुटका होईल.