मिंक्स कराराचे उल्लंघन पुतीन यांचा मुत्सद्दीपणा की घोडचूक ?

29

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जवळपास दीड महिन्यापासून रशियाने युक्रेनच्या सीमेवर आपले सैन्य उभे केले आहे. जवळपास सव्वा लाख सैन्य रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात केले आहे. हे युद्ध होऊ नये यासाठी युरोप खंडातील अनेक देश प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे युद्ध टळेल असे काही जाणकारांना वाटत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केलेल्या एका खेळीमुळे युरोपात पुन्हा युद्धाचे ढग जमा झाले आहेत. पुतीन यांनी सोमवारी अचानक शांतता कराराला तिलांजली देऊन युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुहान्स या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. रशियाच्या संसदेनेही पुतीन यांच्या या निर्णयाला तातडीने मान्यता दिली. यामुळे अमेरिकेसह अन्य देशांनी रशियाचा मिंक्स करार संपुष्टात आल्याची घोषणा केली. त्यामुळे साहजिकच आता हे युद्ध रशिया आणि युक्रेनपुरते मर्यादित राहिलेले नाही. हे युद्ध आता जागतिक युद्धाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे.

काय आहे मिंक्स करार ?

युक्रेन हा पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचाच भाग होता. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर तो स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर युक्रेनला अमेरिकेने पूर्ण सहकार्य केले दोन्ही देशात अनेक करार झाले. २०१४ साली अमेरिकेने युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करण्याचा प्रस्ताव मांडला तेंव्हापासून अमेरिका आणि रशिया यांच्यात युद्धाचे डावपेच सुरू झाले. याच डावपेचात रशियाने युक्रेनचा एक तुकडा क्रिमिया तोडून आपल्या ताब्यात घेतला. त्याचवेळी डोनेत्सक आणि लुहान्स या दोन्ही प्रांतातील रशियन समर्थकांनी युक्रेनपासून वेगळे होण्यासाठी हिंसाचार केला. त्या हिंसाचारात १५ हजार नागरिकांचा बळी गेला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार झाला यालाच मिंक्स करार असे म्हणतात. मिंक्स करार करताना रशियाने या दोन्ही प्रांतात हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्ट केले होते. सोमवारी मात्र रशियाने या मिंक्स शांती कराराचे उल्लंघन करून या दोन्ही प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले इतकेच नाही तर आपल्या लष्कराला या दोन्ही प्रांतात प्रवेश करण्याचा आदेश दिला. रशियाने मिंक्स कराराचे केलेले उल्लंघन अनेक देशांना आवडले नाही.

अमेरिका आणि ब्रिटनने तर याविरोधात निवेदन जारी करून रशियाचा निषेध करत रशियाला याची किंमत चुकवावी लागेल अशी धमकी दिली आहे. एकंदरीत रशियाने लष्करी कारवाई न करताही युक्रेनच्या दोन प्रांतावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले आहे. म्हणजे रक्ताचा थेंब न सांडता कुटनीतीने युद्ध सुरू झाले. युद्धशास्त्रानुसार सैन्य आणि शस्त्रशक्तीचा कमीतकमी वापर करून शत्रूला गाफील ठेवून कुटनीतीने युद्ध जिंकण्यावर भर द्यावा. हाच मुत्सद्दीपणा पुतीन यांनी दाखवत युक्रेनचे तुकडे पाडले. मात्र काही जाणकार पुतीन यांचा हा मुत्सद्दीपणा नसून घोडचूक असल्याचे म्हणतात कारण पुतीन यांच्या या खेळीमुळे युरोपातील अनेक देश रशियाच्या विरोधात जातील याचा फायदा घेऊन अमेरिका रशिया विरुद्ध मोर्चेबांधणी करेल तसे झाले तर अमेरिका रशिया यांच्यातील शीतयुद्धाचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात होईल आणि ती तिसऱ्या महायुध्दाची सुरवात असेल असे काही जाणकारांचे मत आहे अर्थात पुतीन यांची ही खेळी मुत्सद्दीपणा आहे की घोडचूक ? हे येत्या काही दिवसांतच समजेल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५