कुंझर येथे तात्यासाहेबांच्या जन्मदिनी प्रबोधनपर व्याख्यान संपन्न

31

🔸शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर हेच आमचे आदर्श – पी.डी.पाटील सर

🔹महापुरुषांना जाती – जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका – लक्ष्मणराव पाटील

✒️चाळीसगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चाळीसगाव(दि.13एप्रिल):- कुंझर ता. चाळीसगाव येथे राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ व कुंजर वासियांच्या साक्षीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुंझर येथील प्रल्हाद सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच दिलीप मोरे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी.डी. पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य तथा RTI चे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार निलेश पवार, प्रकाश जयराम पाटील उपस्थित होते.

सर्वप्रथम प्रमुख वक्ते पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब वाघ व मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कुंझर येथील आठवी चा विद्यार्थी रोहित भगवान सोनवणे याने महात्मा फुले यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य विशद केले. शिवजयंती चे खरे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले हेच होय. सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम तात्यासाहेबांनी केले. तात्यासाहेब एक उत्तम शेतकरी, उद्योजक, विचारवंत, समाज सुधारक, पट्टीचे पैलवान, स्त्री शिक्षणाचे जनक , शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ असे बहुआयामी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर हेच आमचे आदर्श आहेत असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले.

महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे, बहुजन महापुरुषांचे विचारच आपल्याला तारतील त्यांच्या विचारांवर चालण्याची नित्तांत गरज आहे, महापुरुषांना जातीच्या जातीत वाटून त्यांच्या विचारांची माती करू नका असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.या जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन व आभार प्रल्हाद सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ कुंझर व समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.