भूम येथील साहित्य संमेलन नव साहित्यिकांसाठी पर्वणी!

28

भूम येथील शंकरराव पाटील व नव्याने सुरू होत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे २०२२ रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने एक दिवसीय उस्मानाबाद जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नव साहित्याकांना स्वतःचे साहित्य रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी नवीन व्यासपीठ मिळणार असल्याने या साहित्य संमेलनाकडे उस्मानाबाद जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्यिक उपस्थित राहणार असून संमेलनात चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

त्याच बरोबर या संमेलनात नव साहित्याकांना स्वरचित साहित्य सादर करण्याची संधी दिली जाणार आहे यातील उत्कृष्ट स्वरचित साहित्यास प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. याशिवाय अनाथ बालकांसाठी काम करणारी व्यक्ती, संस्था, धार्मिक कार्यातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार, तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवण्यासाठी भूम येथे होणारे हे साहित्य संमेलन महत्वाचे पाऊल ठरणार आहे. साहित्याचे विविध प्रकार असतात. त्यानुसार साहित्य चळवळीतही विविध प्रवाह असल्याचे दिसते. एकाच प्रकारच्या साहित्य संमेलनात सर्व प्रकारचे साहित्य प्रकार चर्चिले जावे असे अपेक्षित असले तरी साहित्याचे काही अंतरंग उपेक्षित राहतात. नव साहित्यिकांना विशेषतः ग्रामीण भागातील साहित्यिकांना आपले साहित्य सादर करण्याची संधी मिळत नाही.

इच्छा आणि पात्रता असूनही ग्रामीण भागातील नव साहित्यिकांना आपले साहित्य सादर किंवा प्रकाशित करण्यास व्यासपीठ मिळत नाही. ही संधी भूम सारख्या ग्रामीण भागात होणाऱ्या साहित्य संमेलनात मिळते. नाहि रे… , उपेक्षित वर्गासाठी असे साहित्य संमेलन पर्वणी ठरतात. साहित्य संमेलन केवळ साहित्या पुरतीच मर्यादित नसतात, तर संस्कृतीशीही निगडित असतात. संस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम भूम सारखे ग्रामीण साहित्य संमेलने करत असतात. साहित्यातील वेगवेगळे प्रकार, पुस्तके ग्रामीण भागातील नागरिक आणि मुलांपर्यंत पोहचवण्याचे काम या साहित्य संमेलनातून होत असते. ग्रामीण भागातील मुले व नागरिकांची पावले साहित्याकडे वळवण्याचे आणि त्यातून आस्वादक घडवण्याचे काम ही संमेलने करत असतात.

ग्रामीण भागात होणाऱ्या भूम सारख्या साहित्य संमेलनामुळे ग्रामीण भागातही साहित्य चळवळ जोर धरणार आहे नव्हे ती जोर धरू लागली आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघाची नवीन चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या चळवळीची मुहूर्तमेढ भूम येथील साहित्य संमेलनात रोवली जाणार असून हळूहळू ती संपूर्ण राज्यात पसरणार आहे. भूम सारख्या ग्रामीण भागात साहित्य संमेलन हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनातमध्येही जे मिळणार नाही ते या साहित्य संमेलनातून मिळणार आहे. या संमेलनातून ग्रामीण भागातून नवे चांगले साहित्यिक निर्माण होतील यात शंका नाही. भूम येथे होणाऱ्या उस्मानाबाद जिल्हा मराठी साहित्य संमेलनास मनापासून शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)