खासगी बसना शहरात प्रवेश बंदी पोलिसांचा योग्य निर्णय-पोलीस प्रशासनाचे सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे

13

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.27सप्टेंबर):- कोल्हापूर एस. टी. स्टँड परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. कोल्हापुरातून बाहेर जाणारी व कोल्हापुरात येणारी संख्या प्रचंड आहे असे असताना कोल्हापूर एस. टी. स्टँड मधील सरकारी बसेस उभा राहणाऱ्या ठिकाणापासून जवळच खाजगी बसेस मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच ट्रॅफिक जामचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. कोल्हापूरातील अनेक लोकांना सरकारी एस. टी. बसेस मधून प्रवास करायचा असतो, परंतु खाजगी बसेसचे एजंट त्यांना वाटेतच अडवून खाजगी बसेसची तिकिटे घेण्यासाठी बळजबरी करतात. एस. टी. बसच्या परिसरात प्रवासी उतरला की हे एजेंट कळप करून झडप घालून प्रवास्यांना तिकीट घेण्यासाठी त्रास देतात. अनेक प्रवासी नाईलाजाने खाजगी बसचे तिकीट खरेदी करतात.

त्याचा परिणाम एस. टी. बसच्या उत्पन्नावरती होताना आपणास दिसून येतो. वास्तविक एस. टी. बसच्या उत्पादनापेक्षा खाजगी बसेसच्या मालकाचे उत्पन्न अधिक असताना दिसून येते. त्यातच खाजगी बस मालक मनमानी पद्धतीने तिकीट आकारणी करतानाही दिसून येतात. हे सर्व लोक सरकारी खजिना अप्रत्यक्षरीत्या लुटण्याचेच काम करतात. त्यामुळे या खाजगी बसेस एस. टी. स्टँडच्या शेजारी उभा न करणे हा पोलीस प्रशासनाने घेतलेला अतिशय योग्य असा निर्णय असून कोल्हापूर पोलीसांच्या या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. खाजगी बस प्रवेश बंदीचा पोलिसांनी घेतलेला निर्णय भविष्यात बदलू नये ही अपेक्षा आहे.

खाजगी आराम बस एस. टी. स्टँडच्या परिसरामध्ये येऊ न देणे ही महत्त्वाची बाब असून भविष्यात कोणाच्यातरी दबावापोटी हा निर्णय बदलू नये अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. *कोणाच्यातरी दबावात येऊन हा निर्णय बदलल्यास कोल्हापूर विकास आघाडीच्या वतीने आम्हाला या बदलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.* सध्या तरी आम्ही कोल्हापूरकर पोलीसांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत करतो. खाजगी बस प्रवेश बंदीच्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे.