विकासकामे कोण करतो हे जनतेला माहित आहे – आ.डॉ.गुट्टे

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30ऑक्टोबर):- मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी पायाभुत सुविधांसह इतरही विकासकामे पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. तीन तालुक्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी समतोल राखण्याचाही प्रयत्न करीत असतो. शासकीय कामे करून घेताना मंजूरी मिळाली तरी निधी उपलब्ध होण्यास थोडाफार वेळ लागतो. त्यामुळे काही लोक माझ्या बाबतीत गैरसमज पसरविण्याचे काम करतात. मात्र, केवळ निवडणुक आली आहे म्हणून कामे करणाऱ्या लोकांपैकी मी नाही. कारण, माझ्या कामाची घौडदौड कायम म्हणजे बाराही महिने सुरू असते. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला किंवा गैरसमजाला मी भीक घालत नाही. कारण, विकासकामे कोण करतो हे जनतेला चांगलेचं माहित आहे, असा टोला आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

तालुक्यातील डोंगरजवळा येथे सरपंच नितीन खोडवे व मित्रमंडळाचे बळीराम मुंढे यांनी आयोजित केलेल्या डोंगरजवळा ते गणेशपुरी मठ रस्त्याचे लोकार्पण व किर्तन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, माजी पं.स.सदस्य लक्ष्मण मुंढे, बडवणीचे सरपंच संभुदेव मुंढे, कोद्रीचे सरपंच नागनाथ लटपटे, डोंगरपिंपळाचे सरपंच वैजनाथ तिडके, उंडेगावचे सरपंच सुशिल केंद्रे, डोंगरगावचे सरपंच दत्ता आडे, कातकरवाडीचे सरपंच शिवाजी कातकडे, माखणीचे सरपंच रमेश सिसोदे, पोखर्णीचे सरपंच दत्ता वाळके, मानकादेवीचे सरपंच सुभाष गरड, अंतरवेलीचे सरपंच शिवाजी चाटे होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, ग्रामीण भागात पायाभुत सुविधा मजबूत झाल्या तर लोकांचे जनजीवन सुरळीत होईल. त्यांना चांगला प्रवास करता येईल. त्यामुळे मी रस्त्यांना विशेष प्राधान्य देतो. म्हणूनचं आपल्या मतदार संघातल्या रस्त्यांचं जाळं भक्कम होत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज हे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. लोकहितासाठी होत असलेल्या या लोकार्पण कार्यक्रमास आपण किर्तन सोहळ्याची जोड दिली आहे, याचा मला आत्मिक आनंद आहे. कारण, समाज व अध्यात्म हातात हात घालून चालत राहिल्यास समाजाची वाटचाल एकता आणि अखंडतेकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ह.भ.प.सोपान महाराज सानप शास्त्री हे नेहमी मानवी मूल्ये आपल्या किर्तनातून सांगत असतात. त्यांचे रसाळ आणि ओजस्वी किर्तन ऐकण्याचा काही वेळा योग आला आहे. आज सुध्दा त्यांचे सकारात्मक आणि प्रेरणा देणारे आध्यात्मिक विचार ऐकून खूपच समाधान वाटले.कार्यक्रमाच्या नंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.