भारतीय संविधान म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा दस्ताऐवज – अॅड. भुपेन्द्र रायपुरे

26

🔹चिमुर येथे संविधान सन्मान समारोह

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.27नोव्हेंबर):- भारतीय स्वातंत्र्य व भारतीय संविधान यांचा अर्थाअर्थी खुप मोठा संबंध आहे. भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संविधान निर्मीती हा महत्वाचा टप्पा आहे. देशाचे अखंडत्व सविधानामुळेच टिकुन आहे. भारतातील विविधता, अनेक भाषा, संस्कृती, धर्म, जात, पंथ, वंश, वेगवेगळ्या चालीरीती, रूढी-परंपरा या सर्वाना एका सुत्रात बांधणारा ग्रंथ म्हणजे संविधान होय. सामान्य नागरीकांसह इतर सर्वांना समान रेषेत ठेवणाऱ्या भारतीय संविधानाला जागतिक अभ्यासक हे सामाजिक परिवर्तनाचा दस्ताऐवज समजतात असे प्रतिपादन भारतीय सविधानाचे अभ्यासक अॅड. भुपेन्द्र रायपुरे यांनी केले.

संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतिने चिमुर येथील संविधान चौकात आयोजित संविधान सन्मान दिन समारोहाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अँड. भुपेन्द्र रायपुरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक विचार मंचावर ठानेदार मनोज गभणे, वसंत वारजुरकर, घनश्याम डुकरे, मनिष तुमपल्लीवार, एकनाथ थुठे आदी मान्यवर उपस्थीत होते.

भारतीय संविधानातील तरतुदीमुळे नागरीकांच्या मुलभुत अधिकारावर जर गदा येत असेल तर असे केलेले कायदे न्याय प्रक्रियेतून रद्द केले जातात. कारण भारतीय नागरीकांच्या मुलभुत अधिकारांच्या संरक्षणांची जबाबदारी संविधानाने न्याय पालिकेकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी देशात उच्च व सर्वोच न्यायालय अस्थित्वात आहे. कुणीही व्यक्ती सर्वोच्च पदाने,संपत्तीने, प्रसिद्धीने, कलेने कितीही मोठा असला तरी तो व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही असे अभ्यासपुर्ण व विविध उदाहरणे देऊन अँड. भुपेन्द्र रायपुरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरीकास व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. संविधानामुळे सर्व धर्म समावेशक समाज आज आपल्या देशात टिकुन आहे. भारतीय संविधानात विकासाचा केंद्र बिंदु हा “मानवाचा विकास” आहे. सर्वांनी संविधानावर विश्वास ठेवुन पुढील वाटचाल करावी असे सांगत आमदार बंटी भांगडिया पुढे म्हणाले, चिमुर येथिल संविधान चौकात भारतीय राजमुद्रेचा स्तंभ उभारून एक प्रेरणास्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे संचालन सुरेश राउत, प्रास्तावीक नंदन लोखंडे यांनी केले. दरम्यान चिमुर शहरातील महापुरूषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीतील बहुसंख्य नागरीकांचा सहभाग हा चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार, संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. दरम्यान गोकुल सिडाम यांनी भारतीय संविधान, देशभक्ती गीते सादर केली. प्रकाश मेश्राम व संच यांनी रात्री उशिरा पर्यंत भिमगीतांच्या माध्यमातुन प्रबोधन केले.