तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नागपूरकर भर पावसात रस्त्यावर

16

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(16जुलै):- महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बुधवारी नागपूरकर रस्त्यांवर आले. नाशिक व नवी मुंबईनंतर नागपुरातही असा प्रकार घडला. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक पाऊस असतानाही संविधान चौकात एकत्र जमले. त्यांनी मुंढेंना पाठिंबा व्यक्त करतानाच महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात घोषणा दिल्या. नागपूर विकास परिषद या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मुंढेंना निवेदन देत पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आर्य यांनी समाजमाध्यमावरून हे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. डोक्यावर ‘मी तुकाराम मुंढे’ अशी पांढरी टोपी घालत हातात मुंढेंचे फोटो असलेले समर्थनाचे फलक झळकावले जात होते. ‘मुंढे यांना पहिल्या दिवसापासून सत्ताधारी भाजप व त्या पक्षाचे नगरसेवक त्रास देत आहेत. त्यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन पोलिसात तक्रार करण्यात आली. एवढेच नव्हे तर स्मार्ट सिटीचा मुद्दा पुढे करून खुद्द महापौर व सत्ताधारी नेत्यांनी पोलिसात तक्रार दिली. मुंढेंना यापुढे त्रास दिला तर भाजप नगरसेवकांना घरी स्वस्थ बसू दिले जाणार नाही. रस्त्यांवर उतरून यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल.’ असे आर्य यांनी सांगितले.

आंदोलनाची वेळ दुपारी १२ वाजताची असताना अर्धा तास आधीपासूनच आंदोलनास सुरुवात करण्यात आली. दुपारी दीडपर्यत हे आंदोलन झाले. पाऊस असतानाही भिजत नागरिक रस्त्यांवर तळ ठोकून होते. भाजपविरोधी घोषणा व मुंढे समर्थनाचे फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी, माजी नगरसेवक भोला बैसवारे, दिलीप जैस्वाल, रवींद्र धींधोडे, माजी नगरसेवक अशोक काटले, संजय जैस्वाल, मेहरूनिस खान, माजी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर साखरकर, विरेंद्र यादव, शालीनी धोटे, राष्ट्रवादीचे उत्तर नागपूर अध्यक्ष विशाल खांडेकर, संजय शिवाळे, राजू जैन, प्रकाश भोयर, रोशन भिमटे, संजय मेहर, कमल चंदवानी, हसमुख सागलानी, शरद शाहू, राजू तुलसी, सुरज मेश्राम, महादेव फुके यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर होते.

मुंढेंसाठी आंदोलन का?

जूनमध्ये स्वच्छ होणारे शहरातील नाले एप्रिलमध्येच स्वच्छ केले. १.०२ कोटीचा खर्च ३७ लाखांवर आणून ६५ लाखाची बचत केली.

खासगी हॉस्पिटलपेक्षाही चकाचक रुग्णालयाची निर्मिती केली.

करोना काळात १२ विलगीकरण केंद्रात ५.२५ कोटीपैकी केवळ २ कोटीचा खर्च केला.

विलगीकरण केंद्रातील नागरिकांसाठी ६०० रुपयाऐवजी प्रति व्यक्ती १५९ रुपये खर्च करून प्रति व्यक्ती ४४० रुपयाची बचत केली

विलगीकरण केंद्रात राधास्वामी सत्संग न्यासकडून मोफत जेवणाची सोय करून दिली. केवळ जेवण वाहतूक खर्च तेवढा दिला जातो.

‘मुंढेजी, हे करा’
सिम्बॉयसीसला १ रुपये प्रति फूट १०० एकर जागा दिली. याच दरात शहरातील गरिबांनाही जागा द्या

कचरा घोटाळा, स्टार बस घोटाळा, अखंडीत पाणीपुरवठा, पाणी टॅंकर घोटाळा आदींची चौकशी करा