आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹विधानभवनातील बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष

म्हसवड(दि.25मार्च):- गेल्या काही महिन्यांपासून कळीचा मुद्दा ठरलेली मुंबई – बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर म्हसवड परिसरातच होण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला. दुष्काळी भागात एमआयडिसी होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने दोन्ही तालुक्यात जल्लोष करण्यात आला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आ. जयकुमार गोरे , उद्योग विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव संजय देगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, दत्ता मडकवार, राहुल भिंगारे, स्विय सहाय्यक संजय दिडवाघ, स्वीय सहाय्यक हितेंद्र पाटील, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रांत ऑनलाईन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विभागाचे अधिकारी आणि श्री. अरुण गोरे , श्री. निलेश माने उपस्थित होते.

सुरुवातीला सदर औद्योगिक वसाहत सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर म्हसवड – धुळदेव परिसरात मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत मोठे राजकारण घडले. म्हसवड परिसरात औद्योगिक वसाहतीला लागणारी जमीन उपलब्ध नाही, रस्ते नाहीत अशा अफवा उठवण्यात आल्या. राजकीय वजन वापरुन दिशाभूल करण्यात आली. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तसा अहवालही वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला. सदर औद्योगिक वसाहत कोरेगाव तालुक्यात हलविण्याचा घाट घालण्यात आला. त्यानंतर काहींनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने केली. अनेक महिने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण होते. आता मात्र औद्योगिक वसाहत म्हसवड परिसरातच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात हजारो कोटींची गुंतवणूक होवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने जनतेने आनंदोत्सव साजरा केला.

अपप्रवृत्तींना धडा शिकवून लढाई जिंकल्याचे समाधान ……

ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत म्हसवडला औद्योगिक वसाहत मंजूर झाली असतानाही विनाकारण संघर्ष करावा लागला. माण – खटावचा द्वेष करणाऱ्या रामराजेंनी एमआयडिसी इतरत्र नेण्याचे सर्व प्रयत्न केले. जनतेची दिशाभूल केली. अधिकाऱ्यांना इथली परिस्थिती प्रतिकूल असल्याचे चुकीचे रिपोर्ट द्यायला भाग पाडले. त्यांनीच एमआयडिसी पळवायचे आणि पुन्हा त्यांच्याच काही बगलबचांनी आंदोलन करायचे हा हास्यास्पद खेळही झाला. मी माझे प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत. कुणालाही इथले साधे कस्पटही नेऊन देणार नाही, एमआयडिसी तर नाहीच नाही असा शब्द जनतेला दिला होता. इतके करुनही रामराजे आणि राष्ट्रवादीच्या बगलबचांना नेहमीप्रमाणे तोंडावर आपटावे लागले. आता या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होवून येथील हजारोंच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध होईल. पाण्याच्या योजना पूर्णत्वाला जात असल्याने बागायती शेती, साखर कारखानदारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे. ग्रीनफिल्ड हायवे मतदारसंघातून जात असल्याने आणखी आमूलाग्र बदल होवून आपण विकासाच्या नव्या उंचीवर जात आहोत अशी प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.