काळजात ठसठसणा-या जखमांचा प्रदेश

44

संदीप गायकवाड यांची कविता ही भारतीय संविधानातील माणुसकी विचारांची उजेड पेरणी करत मानवाच्या अंत:करषातील काव्यमय प्रकटीकरण कविता करते.

अवतीभवतीच्या घडणाऱ्या घटनांनी कवीचे मन बेचैन होते. जगात मानवी शोषण करणारी व्यवस्था उदयास येत आहे.ग्लोबलायझेशनच्या बरोबरच मानवी मन संकोचित करण्याचे डावपेच सातत्याने रचले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकिय, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण मलीन होत आहे. माणसावर प्रेम करणारा माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. दंगल, जाळपोळ, धार्मिकभेद, उच्चनीचता, जातीवाद, आरक्षण विरोध, भाषावाद, पांतवाद यांना उत आला आहे. अशात सांविधानिक अधिकार आपण गमावत चाललो आहोत. शोषण करणाऱी अभिजन सत्ता जन्म घेत आहे. गरीब, कामगार, शोषित, पिडीत, आदिवासी, स्त्रीवर्ग परिघाबाहेर फेकले जात आहेत. अंधकाराच्या खाई निर्माण होत आहेत. अशा वेदनामय व खदखदणा-या वातावरणात संदीप गायकवाड यांचा “काळजात ठसठसणा-या जखमांचा प्रदेश” आंबेडकर मुल्य जाणिवेची पेरणी करणारा कविता संग्रह नवीन बीज पेरत आहे. कवितेत परिवर्तन शीलता, ऋतुजा, संवेदनशीलता मानवता, संघर्ष, विद्रोही प्रतिबिंबे मानवी मनाला उभारणी देत आहेत. आज कविता विस्कळीत होऊन शहरबाज धारण करत आहे.

संदीप गायकवाड यांची कविता मानवी मनाचे कंगोरे प्रतिबिंबत करणारी आहे. विश्वकल्याणाची जाणीव, सत्यनिष्ठाचा भावार्थ मांडणारी कविता आहे, आपल्या मनोगतात स्वत:स जाणवणारी सल व्यक्त करतात. मनातील घालमेल व सलणारे विचारबीज पेरणारा एकशे तेरा कवितांचा संग्रह वाचणीय असून संग्रही असावा असा आहे.
मा.प्रब्रम्हानंद मडावी सर आपल्या प्रस्तावनेत लिहितात,” आंबेडकर साहित्य हा मानव समाजाच्या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा पाया आहे. त्यामुळेच रंजनवादी,आणि नुसत्या कलावंत अभिव्यक्तीला येथे स्थान नाही. खरं तर बुध्द -फुले- शाहू- आंबेडकर या महामानवाचा मानवतावाद हाच जवळचा जीवनमार्ग आहे. म्हणूनच शोषण करणारी व्यवस्था आणि त्यांचे उठाव सत्ताधीश यांच्या विरोधी बंड करण्यास संदीप गायकवाड यांची कविता उठाव करणारी आहे. सामाजिक चिंतनाचा आणि वैचारिक अभिव्यक्तीचा मोहळ म्हणजे मुक्तछंदातील संदीप गायकवाड यांची कविता होय.”

कवितासंग्रह वाचतांना प्रचंड आशावाद निर्माण करणारा आणि शोषितांच्या सहभागाशिवाय सामाजिक परिवर्तन होणार नाही अशी भूमिका कवी आपल्या कवितेतून मांडत आहे. महत्वाचे म्हणजे मानसिक मनोरंजनेत बदल घडवण्यासाठी दीक्षाभूमी हेच परिवर्तनाचे व ऊर्जामयतेचे केद्र आहे. बंडखोरीचे आत्मबल जागे करणारी कविता संदीप गायकवाड यांची आहे.

संविधानिक हक्काचं हत्याराचा आधार घेऊन शेतकरी आंदोलन क्रांतीच्या दिशेने कृषी कायद्याची नांगरणी करत असतांनाच कुविचारांच्या षडयंत्री मेंदूने शेतकरी आंदोलन कुचलण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. पण डाॅ. बाबासाहेबाच्या संविधानाने बळ मिळाले, आंदोलकांना लढण्याची अणुऊर्जा मिळाली. अशा आंदोलनास नवचेतना देण्यासाठी एकजूटीने लढून भारतीय आईला वाचवणे गरजेचे आहे. क्रांतीसूर्याचा ध्वज हाती घेऊन वेदनेचा बांध फोडायला हवे. एका हाती बुध्द तर दुस-या हाती संविधान घेऊन कवी लढणार आहे. नागपूरच्या युध्द भूमीतून उत्तुंग भरारी मारणारा फिनिक्स उदयास येणार आहे. आईच्या पायाच्या जखमातून आभाळभर कष्टांतूनच कारुण्यांचे दीप प्रज्वलित करणारे गीताच्या अग्नीज्वातून आईनं हाती भीमाचं संविधान दिलं खेळाडूवरील अन्याय पाहून मन अस्वस्थ होते. खेळाडूने केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांच्या कार्याला सलाम केलेचं पाहिजे.

(पा.क्र.३६)
तुम्ही सर्व भारतीय आहात,
भारताला यशोशिखरावर
घेऊन
जाणारे महायोध्दा आहात
तुम्ही आपले सर्वस्व लावून खेळले
देशाला मेडल मिळवून दिले.
या कार्याची दखल घेतलेच पाहिजे.

सायबरच्या बनावट खेळात लोकशाहीचा आवाज दाबला जातोय, क्रांतीच्या परिवर्तनवादी पाखरांनो तुम्हाला मानवमुक्तीचा संग्राम लढायचा आहे एल्गार करायचा आहे. असे म्हणतात., (पा.क्र.३९)
उठा वीर क्रांतीतरुणांनो
स्वातंत्र्याची तेवत ठेवू अग्नी
सत्तेच्या मग्रुर मनकपटांची
उदध्वस्त करु छावणी.
कारण भारतीय लोकांच्या रक्तशोषणावरच
सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट उभे राहत आहे. पर्यावरणाची कत्तल चालू आहे. गंगेच्या पात्रात शव तरंगत आहेत, सत्य, न्याय गाडला जात आहे, लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे. गरीबी, शोषण, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार, दंगल,याविरूद्ध. लढायचे आहे. भारताचे अभ्युदय, अस्तित्व, एकात्म, स्वातंत्र्य, प्रजासत्ताक यांना वाचवणे गरजेचे आहे. मोबाईलचे अभासी जग यांच्या निखा-यावर आयष्य भाजून निघत आहे. लाँकडाऊनच्या काळात अनेक लोकांना पायपीट करावी लागली, सर्वस्वी हरवून उन्हातान्हात चालतांना होणारी होरपळ पाहून सरांना होणारी घालमेल बाबत लिहितात, (पा.क्र.४९)
पेटणा-या चुलीला
नाही मिळत सरपणं
शिजवून कसं अन्न
नाही डब्यात दळणं
आयुष्याचं उधळून निघालं होतं संदीप सरांची कविता असे अनेक जीवनातील वास्तव रुप घेऊन सर्वांनाच विचार करायला व अस्वस्थ करते, स्वतः शिक्षक असलेले शिक्षका विषयी म्हणतात, ज्ञान पेरणारा, मनुजा घडवणारा, शब्दांच्या साह्याने राष्ट्र पेटवणारा, नवीन ज्ञान स्विकारुन जुने धिक्कारत राष्ट्राचा पाया ज्ञानाने बांधणारा, अज्ञान, अंध:काराला ज्ञानाने दूर करुन जीवन फुलवणारा अशा शिक्षकाविषयी लिहितात.(पा.क्र.५३)
खरा ज्ञानवंत शिक्षक,
भारताचा आधारस्तंभ बनतो!
जगाच्या समस्येवर,
नवे संशोधन करतो
आसिफा कविता विचार करायला लावते, तिच्या रक्ताची शपथ घेऊन कवी मनूवादी विचारांना जमीनदोस्त करण्याची हीच वेळ आहे. हीच खरी आसिफाला शब्दांजली. विषमतेच्या पायांना सुरुंग लावायची हीच वेळ आहे. मस्तमौला हैवानांना हद्दपार करतांना आपण वादळवारा व्हायला पाहिजे. स्वतःच्या मगटावर विश्वास ठेवून अन्याय करणा-याच्या मुळांना आग लावायला हवे, काळजात ठसठसणा-या जखमांचा प्रदेश आज रणांगण बनले आहे. जैविक महायुध्द सुरु आहे, आरोग्याचे सैनिक अविरत राबत आहेत. अनेकांचे जीवन उध्वस्त होत आहे. अशा वेळी नव्या सूर्याच्या शोधात कवी आहे. आता निळे निशाणच आपणास वाट दाखवणार असे ठामपणे सांगतात. (पा.क्र६९)
आता आम्ही कामगार क्रांतीचे
बिगुल फूंकणार आहोत ….
आमचे महायुद्ध आम्ही
लढणार आहोत
षडयंत्राचा भंडाफोड करुन
आमचे निळे निशाण
जगतात फडकवणार आहोत.

कारण आज माणूसच माणसापासून वजा झाला आहे. करोनाने तर माणसाचा गुणाकार केला आहे. जगाच्या ग्लोबल संस्कृतीचा बोजा वाजला आहे. आम्ही नुसत्या पोटासाठी पत्रावळी शिवत बसलोय. तर याच पत्रावळीने कवीचे आयुष्य प्रकाशमान केले. स्वतःचा जीवनपट आठवत मनात मायेचा ओलावा निर्माण होतो. कधी भाकरीच्या तुकड्यासाठी लढतांना हैरान होतो, दु:ख हिमालयासारखं होतं, उत्तीर्ण होण्यासाठी रक्ताचं पाणी करूनही यश मिळत नाही. काँपी करणाराच श्रेष्ठ होतो.
(पा.क्र.७७)
आता वाटते त्याच्या
फसव्या चेह-याचा पर्दाफाश करावा
सा-यांना उचलून हिंदी महासागराच्या
केंद्रस्थानी
नेऊन जलसमाधी द्यावी
तेंव्हाच समतेचं नवीन विश्व उभं राहीलं.

बाबासाहेबांनी खूप दिलं हो, ज्ञानाचा महासागर उघडा केला, भूकेशी लढण्याची जीद्द दिली, भाकरीचा सूर्य शोधणाऱ्याच्या जीवनात नव चैतन्य निर्माण केलं, नवी पहाट दिली, लेखनीतून मुकनायकाला वाणी दिली, जगाला नवा बुध्द दिला, समतेचा अंगार दिला, लोकशाहीचे नवे झाडं दिलं, निळ्या निशानासाठी महाऊर्जा दिली, आत्मभान जागवलं, अन्यायाचे प्रहार करायला शिकवलं, सन्मान माणसाच्या ह्दयात तेवत ठेवला. जग बुध्दमय बनविण्याचा मंत्र दिला, धम्मांच्या ज्ञानकिरणांनी पंचशीलेचे पाच रंग दिले, अत्तदीपभव, अष्टांग विचार एवढे सारे बाबांनी दिले, दहा परिमिताच्या ऊर्जेनी प्रज्ञावान बनवले (पा.क्र.८४)
अज्ञानाच्या अंधकाराला,
चिरत एक पणती आली
चातुर्वर्ण्याच्या जुलमावर ,
बुध्दाची क्रांती झाली
निरंजनेच्या सरिता जलानी,
भारत बनला सुजलाम्
पंचशीलेच्या पाच रंगानी………
मेलेली माणसेही आता वादळ होऊन लढणार आहेत.भीमा कोरेगावचा क्रांतीसंग्राम पुन्हा पेटणार आहे. देशातील समस्त नारी सावित्रीची मशाल हाती घेऊन अमानुषतेलाआग लावतील,
महाक्रांतीनायकाच्या बोटाचा अर्थ समजून आपली आयुधं पाजळायची वेळ आली आहे.समाजवादाची मुल्य नव्याने स्विकारायला हवीत. अन्यायावर जोतिबाचा आसूड ओढायचा आहे.रक्तात अन्यायाचा प्रतिकार पेटवत सूर्यपुत्रांनो, अग्नीज्वालानों, भारताच्या उत्थानासाठी अन्याय पेरणा-या कर्दनकाळाला भस्म करण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवायला हवी.असे पुन्हा पुन्हा आव्हान करुन संविधानाचा सूर्य कवी लोकांच्या हाती देणार आहे. म्हणून कवी संदीप गायकवाड सर म्हणतात, (पा.क्र.११७)
काळोखाच्या साम्राज्यावर
सूर्यकुलाचे वादळ निघाले
भारतातील अंधरुढीवर
बाबासाहेबांनी इंजेक्शन टोचले.
संविधाननिष्ठ शिक्षणनीतीची आणि लोकशाही शिक्षणाच्या शिदोरीची आज देशाला गरज आहे. अजूनही कवीला शिक्षक, सैनिक, शेतकरी, कामगार, इंजीनियर, लेखक, यांच्यावर विश्वास आहे. तेच सच्चे शिलेदार आहेत. तिरंगा राष्ट्रध्वज हाच कवीचा प्राण आहे. अशोकचक्र कवीची गती आहे आणि धम्म जीवनदाता आहे. मस्तकावर हिमालय, चरणस्पर्श हिंद महासागर, पश्चिमेस अरब सागर, पूर्वेला बुद्धाची सम्म्यक क्रांती, मध्ये नद्यांची उसळणारी गर्दी त्यात गंगा, गोदावरी, नर्मदा, ब्रम्हपुत्रा, नाग, प्राणहिता, हुगळी, कावेरी, वैनगंगा याच्यामुळे कवी सुजलाम् सुफलाम् आहे. शेवटी संविधान हेच माझे महाऊर्जा आहे. या सर्वांच्या सहकार्याने परिवर्तनाचा पाऊस नक्कीच पडेल. मातीतून सम्यक विचार अंकुरेल, सृजनाचा सुंदर अविष्कार होईल हा आशावाद कवीच्या ह्दयात आहे. खोटे स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तव स्वप्न उराशी बाळगायला हवे. असे म्हणत आपल्या कवितेत तरूणांना आव्हान देत म्हणतात. (पा.क्र.१८७)
तरुणांनो
उठा
लढा
बसून राहू नका
हातात मशाल द्या
हातात पेन घ्या
पुस्तक घ्या
बुक घ्या
तुमची क्रांती
तुमच्या हाताने करा
कारण,
तुम्ही देशाचे
क्रांतिकारक आहात.
असे सांगतांना बावीस प्रतिज्ञा वाचून घ्यायला सांगतात. एकट्यानेच किल्ला लढायचा आहे याचा विसर नको. आपण स्वतःच दीपस्तंभ बना नाहीतर येणारा काळ आपणास क्षमा करणार नाही. अशा अनेकविध ठसठसणा-या समाजातील वेदना आपल्या कवितेत शब्दबद्ध करीत वास्तव जीवनातील विदारक सत्य वाचकासमोर कवी कवितेतून मांडतांना त्यावरील उपायही सांगत आहेत या शिवाय शेतीमातीच्या जीवनातील व्यथा कवितेतून मांडतात सर्वच कवितासंग्रह मनातला विद्रोह जसा वाटतो तसा मांडला आहे. या कविता संग्रहातील सर्वच कविता आपले लक्ष खेचून घेतात. मुक्तछंदातील कविता असूनही भावनांनी ओतप्रोत भरलेल्या कविता सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करतात. गतीशील जगात वेळेची प्रासंगिकता ओळखून सहजपणे आणि समर्थपणे आपल्या लेखनीद्वारे वाचा फोडणारा कवी समाज मनावर अधिक प्रभाव ठरतो, वाचतांना मानवाची कल्याणकारी सनद आहे याचा प्रत्यय आपणास निश्चित येतोच. समाजाचा व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा पायाच या संग्रहाने घातला आहे.
यातील भारतीय आई, दाणं, आता लढाई सुरु झाली आहे, मन, शेतकरीआंदोलन, आसिफा, आग, निळेनिशान, भाकरीचासूर्य, धम्मजागर, हाथरस, दगडीकोळसा, सावित्रीबाई, शिवबा, विजयस्तंभ, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, क्रांतीसूर्य,नवा ध्यास, शेकी, फिनिक्स, मार्शल, काळजात ठसठसणा-या जखमांचा प्रदेश या कविता
वाचकांनी वाचाव्या अशाच आहेत. कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका लक्ष वेधून घेते. ज्ञानमाय सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, मँक्झिम गोर्की, पेरियार रामास्वामी नायकर, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे, यांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या क्रांतीतत्वाज्ञाला व माझी आई महानंदा ढिवरुजी गायकवाड हिच्या मानवी संवेदनाशील कृतज्ञतापुर्वक…..
प्रकाशक अशी भोवते,सीवली पब्लिकेशन्स ,नागपूर, ९८८१७१२१४९. येथून प्रकाशित केली आहे. पुस्तकाचे हक्क आयु. रजनी संदीप गायकवाड, नागपूर, मुखपृष्ठ व रेखाचित्र सुधीर कांडरकर याचे अप्रतिम असून कवितासंग्रहाचा आरसाच आहे इतके परिपूर्ण आहे. प्रस्तावना योग्य व कवितेचा सर्व गोषवारा घेणारा आहे. मलपृष्ठावर पाठराखन डाॅ. प्रकाश राठोड सरांनी केली आहे. ‘प्रतिभावंत कवी म्हणून मान्यता दिली आहे. त्यांचा हा संवेदन स्वभाव जितका संयम आहे तितकाच संतप्तही आहे. ही संतप्त संयमता जितकी मोहक आहे तितकीच दाहकही आहे, अशा शब्दात राठोर सर पाठराखण करतात. कविता संग्रहातील प्रासंगिक रेखाचित्रेही खूपच बोलके आहेत कवितेचा भावार्थ सागून जातात.असा संग्रह वाचण्याची मला संधी मिळाली व माझ्या परीने त्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला तो आपण गोड मानून घ्याल हीच अपेक्षा ठेवून सरांना पुढच्या साहित्यलेखनास हार्दिक शुभेच्छा देतो.

*काव्यसंग्रह*
काळजात ठसठसणा-या जखमांचा प्रदेश.
कवी-संदीप गायकवाड
प्रकाशक-अशी भोवते, सुचली पब्लिकेशन्स, नागपूर,
मुखपृष्ठ व रेखाचित्र : सुधीर. कांडरकर, उमरेड
स्वागत मुल्य : ३०० रुपये — *आस्वादक-मुबारक उमराणी, सांगली* मो. ९७६६०८१०९७.