भर पावसात शिक्षकदिनी सेवानिवृत्त शिक्षकांचे धरणे

216

🔹पुरोगामी संघटनेच्या नेतृत्वात शेकडो निवृत्त शिक्षकांचा एल्गार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6सप्टेंबर):- जिल्हा परिषद मध्ये तीस पस्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या बऱ्याच शिक्षकांची लाखोंची प्रकरणे शासनाकडे प्रलंबित असून निवृत्त शिक्षकांनी जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी,लेखी पत्र देऊन , विनंती करूनही जिल्हा प्रशासनाने सदर शिक्षकांना काहीही लाभ दिले नाही .त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचा काळ कसा घालवावा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे .

प्राथमिक शिक्षकांनी आपल्या सेवा काळात गृह बांधणीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ,लग्नासाठी शिक्षक पतसंस्थेकडून ,बँकेकडून लोन घेतले असल्याने सदर लोन सेवा निवृत्तीचे पैसे मिळाल्यानंतर भरता येईल असा विचार करूनच कर्ज घेतले. सेवा निवृत्तीला दोन वर्ष झाले शासनाकडून सदर रक्कम मिळाली नाही त्यामुळे बँकेचे व सोसायटीचे घेतलेले कर्ज भरताच आलेले नाही सदर कर्जावर संस्था ,बँका व्याजाची आकारणी करत आहे त्यामुळे कर्ज वाढतच आहे .अशा अडचणीत शिक्षक वर्ग सापडला आहे.

किती दिवस वाट बघावी म्हणून शेवटी सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षकदिनी जिल्हा परिषद चंद्रपूर समोर राज्यनेते विजय भोगेकर , जिल्हानेते नारायण कांबळे , सल्लागार दीपक वऱ्हेकर , राज्यसरचिटनिस हरीश ससनकर , जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , सरचिटणीस सुरेश गिलोरकर , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , कोशाध्यक्ष सुनील कोहपरे , विलास मोरे यांच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येने एकत्रित येऊन भर पावसात धरणे आंदोलन केले .

याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी आंदोलनाला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा घडवून आणली . पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शिक्षकदिनी सेवानिवृत्त शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणार असल्याचे आश्वस्त केल्याची माहिती प्रसिद्धिप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी दिली आहे .