धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे हस्ते उद्घाटन

252

🔹17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते सायं 7 या वेळेत नागरिकांसाठी खुले-केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. १५ऑक्टोबर):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवसीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास” या विषयावर आधारित मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधिक्षक रीना जनबंधू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार, आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, राहूल घोटेकर उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले की, केंद्रीय संचार ब्यूरोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीची प्रदर्शनाच्या रुपात उत्तम मांडणी केली आहे. प्रत्येक छायाचित्राच्या खाली प्रत्येक घटनेचे वर्णन लिखीत स्वरूपात मांडण्यात आले आहे. जेणेकरून प्रदर्शन पाहणाऱ्यांना माहिती जाणून घेणे सोपे होईल. नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवनप्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या की, केंद्रीय संचार ब्यूरोने माहितीपूर्ण असे प्रदर्शन लावले आहे. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संस्थेने कायमस्वरुपी अशाप्रकारचे प्रदर्शन दीक्षाभूमी येथे स्थापन करण्याबाबत विचार करावा, जेणेकरून चंद्रपूरच्या नवीन पिढीला डॉ. बाबासाहेबांची माहिती पोहचविणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी केली.

अरुण घोटेकर म्हणाले, केंद्रीय संचार ब्यूरोने या प्रदर्शनाच्या माध्यमातून चंद्रपूराला उत्कृष्ठ अशी भेट दिली आहे. या प्रदर्शनातील माहिती अवलोकन करण्यासारखी आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरील हे प्रदर्शन दुर्मिळ आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी तर संचालन उमेश महतो यांनी मानले.

17 आक्टोबरपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले हे प्रदर्शन 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरीकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध दुर्मिळ छायाचित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन हंसराज राऊत यांनी केले आहे.