सायबर गुन्ह्याच्या जनजागृतीसाठी ‘सायबर जागृती यात्रा’

175

🔸भंडारा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भंडारा(दि.15फेब्रुवारी):-विदर्भातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तरुण वर्गामध्ये सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सायबर यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

जागृती सायबर गुन्ह्याबाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात, सायबर जागृती यात्रेचे मुख्य संशोधक तथा सहाय्यक प्राध्यापक आणि स्थानांतर संरचनेचे निर्देशक डॉ. नवीन मुकेश पंजाबी यांच्या अध्यक्षतेमध्ये सायबर जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले.

सदर पथक संशोधन व जागरूकता उपक्रमांतर्गत लघु संशोधन प्रकल्पाकरीता माहिती संकलित करण्यासाठी मणिभवन गांधी संग्रहालय, मुंबई येथून दि. ७ फेब्रुवारी रोजी सायबर जागृती यात्रेची सुरुवात करण्यात आली. सदर सायबर जागृती यात्रा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांना भेटी देऊन १७ फेब्रुवारी २०२४ रोजी समारोप करणार आहेत.

सायबर जागृती यात्रेचे मुख्य संशोधक डॉ. नवीन पंजाबी संशोधक विद्यार्थ्यांच्या पथकासह भंडारा येथे दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल झाली. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात, सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात शहरातील जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा, जे.एम.पटेल महाविद्यालयाचे एन.एस.एस कॅम्प, शक्ती माता मंदिर, भंडारा तसेच डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेज शहापूर या ठिकाणी जाऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व त्यास प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेसंदर्भात माहिती देण्यात आली.

त्यासोबतच, मोबाईल तंत्रज्ञानाचा जपून वापर करणे, आर्थिक फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन १९३० डायल करणे, सायबर गुन्ह्यासाठी cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल हरवल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर कळवावे आदी सायबर गुन्हे सुरक्षिततेच्या उपाययोजनेबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.